Ad will apear here
Next
माधुरी दीक्षित-नेने, सुबीर सेन, महिपाल


प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने, बंगाली गायक सुबीर सेन यांचा १५ मे हा जन्मदिन. तसेच, जुन्या काळातील अभिनेते व कवी महिपाल यांचा १५ मे हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
..........
माधुरी दीक्षित-नेने
१५ मे १९६७ रोजी माधुरी दीक्षित-नेने यांचा जन्म झाला. ‘सुंदरता’, ‘नृत्य’ आणि ‘अभिनय’ यांचा सुरेख त्रिवेणी मिलाफ म्हणजे पूर्वाश्रमीची माधुरी शंकर दीक्षित आणि आजची माधुरी श्रीराम नेने.

माधुरी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून, तिची लोकप्रियता सातासमुद्रापार आहे. ९०च्या दशकात सुपरहिट चित्रपट करणारी माधुरी सध्या विविध कारणांमुळे चर्चेत येत आहे. विशेष म्हणजे मोठा पडदा गाजवल्यानंतर माधुरी आता वेबविश्वात पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जात आहे. माधुरी ही खऱ्या अर्थाने सौंदर्य, अभिनय आणि नृत्य यांचा अभूतपूर्व एकत्रित संगम आहे. माधुरी दीक्षितने १७ वर्षांची असताना राजश्री प्रॉडक्शनच्या ‘अबोध’ चित्रपटात काम केले. तो खूप चालला नाही. पुढे तिने ‘मोहरे’, ‘मानवहत्या’ असे ‘बी’ ग्रेडचे चित्रपट केले. मीनाक्षी शेषाद्री प्रमुख भूमिकेमध्ये असताना ‘स्वाती’ आणि ‘आवारा बाप’ या चित्रपटांमध्ये माधुरीने सहायक भूमिका केल्या. ‘उत्तर दक्षिण’ हा माधुरी दीक्षितचा पहिला व्यावसायिक चित्रपट.

त्या वेळी मराठी मुली हिंदी चित्रपटात फारशा यशस्वी होत नव्हत्या, अपवाद फक्त नूतन, स्मिता पाटील आणि पद्मिनी कोल्हापुरे यांचा. पण ‘तेजाब’च्या आधी ओळीने आठ अपयशी चित्रपट देऊन ‘एक दो तीन ..’ असे म्हणत माधुरीने घवघवीत यश मिळवले. नंबर वनच्या पदावर विराजमान होणारी माधुरी ही पहिली मराठी अभिनेत्री ठरली. तिच्या दिलखेचक अदांनी तर संपूर्ण सिनेसृष्टीला दिवाणे केले. तिचे ‘हम आपके है कौन’मधील कामही हिट ठरले. 

माधुरीच्या नावाचे ‘गाणे’ (माधुरी दीक्षित मिली रस्ते में..) आणि चित्रपटही (मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ) आला. तिने दोन चित्रपटांत (धारावी, बडे मियां छोटे मियां) ‘माधुरी दीक्षित’चीच भूमिका केली. माधुरी दीक्षितची जोडी अभिनेता अनिल कपूरसोबत खूपच फेमस झाली होती. अनिल-माधुरीच्या जोडीने त्या काळी ‘तेजाब’, परिंदा’, ‘राम-लखन’, ‘किशन कन्हैया’, ‘जीवन एक संघर्ष’, ‘जमाई राजा’, ‘खेल’ ‘बेटा’, ‘जिंदगी एक जुआ’, ‘राजकुमार’, ‘पुकार’ हे हिट सिनेमे केले. तिला १६ चित्रपटांतील भूमिकांसाठी निरनिराळ्या पुरस्कारांकरिता ‘नामांकन’ मिळाले, तर प्रतिष्ठेचा ‘फिल्म फेअर’ पुरस्कार दिल, बेटा, हम आपके हैं कौन, दिल तो पागल है, देवदास या चित्रपटांसाठी तिला मिळाला. ‘हम आपके हैं कौन’ या चित्रपटानंतर तर माधुरी दीक्षित लोकप्रियतेच्या शिखरावर होती; मात्र त्यानंतर आलेले राजकुमार, प्रेमग्रंथ, कोयला, मृत्युदंड, महानता असे चित्रपट न चालल्याने ‘माधुरीची जादू संपली..’ अशा शब्दांत समीक्षकांनी टीका करणे सुरू केले. ‘दिल तो पागल है’ प्रदर्शित झाल्यावर सुरवातीला समीक्षकांनी करिष्मा कपूरचेच अधिक कौतुक केले होते; मात्र सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार ‘दिल तो पागल है’साठी मिळाल्यानंतर याच समीक्षकांचे माधुरीने आभार मानले. कारण त्यांच्याचमुळे अधिक मेहनत करायची प्रेरणा मिळाली असल्याचे माधुरी दीक्षितने नमूद करून आपल्या समीक्षकांच्या टीकेला चोख उत्तर दिले. 

माधुरी दीक्षित यांची क्रेझ अजूनदेखील कायम आहे. माधुरी दीक्षित यांनी आपल्या करिअरमध्ये ७० सिनेमांतून काम केले आहे. छोट्या पडद्यावरदेखील त्यांनी ‘झलक दिखला जा’द्वारे परीक्षक म्हणून रंगत आणली होती. लग्नानंतर माधुरी दीक्षित यांनी ‘गुलाब गँग’ आणि ‘डेढ़ इश्किया’ या सिनेमातून कमबॅक केले होते. 
.....


सुबीर सेन
१५ मे १९३२ रोजी सुबीर सेन यांचा जन्म झाला. हेमंतकुमार यांच्यासारखा आवाज असलेल्या सुबीर सेन यांना हिंदी चित्रपटांमध्ये फार थोडी गाणी मिळाली आणि तीही शंकर-जयकिशन यांच्यामुळे. १९५०च्या काळात हेमंतकुमार फार लोकप्रिय होते. त्यामुळे तशाच आवाजाच्या सुबीर सेन यांना शंकर-जयकिशन यांनी ‘आस का पंछी’ चित्रपटात संधी दिली. नायक राजेंद्रकुमार व एनसीसी कॅडेटनी सायकलवरून म्हटलेले सुबीर सेन यांचे ‘दिल मेरा एक आस का पंछी’ हे गाणे फार लोकप्रिय झाले. ‘विविध भारती’वरही ते खूप गाजले. 

त्यानंतर शंकर-जयकिशनच्याच ‘छोटी बहन’मधील ‘मैं रंगीला प्यार का राही, दूर मेरी मंझिल’ हेही गाणे सुबीर सेनना लोकप्रियता मिळवून गेले. टांग्याच्या टापांच्या तालावर लता मंगेशकर यांच्यासोबतचे हे द्वंद्वगीत लोकप्रिय झाले. ‘कठपुतली’ चित्रपटात ‘मंझील वही है प्यार की, राही बदल गये’ हे गाणेही लोकप्रिय झाले. ‘दिल लेके जाते हो कहाँ’ हे आणखी एक गाणे!

१९५० ते १९८० या काळात त्यांची गाणी बंगालीत खूप गाजली. त्या मानाने त्यांना हिंदीत फार थोडी गाणी मिळाली. अतिशय मोजकी पण लक्षात राहणारी गाणी सुबीर सेन यांनी हिंदीत गायली. हिंदी चित्रपटांत एके काळी गाण्याची अतिशय निकोप अशी स्पर्धा होती. त्यामुळे हेमंत कुमारसारखा आवाज म्हणून असलेल्या सुबीर सेन यांना खुद्द हेमंत कुमार यांनीच आपल्या चित्रपटात गायला लावले होते. लता, आशा, सुमन या त्या वेळच्या या गायिकांसोबत गाणे गाणाऱ्या सुबीर सेन यांना गीता दत्तसोबतही गाणे गायची संधी मिळाली होती. सुबीर सेन यांचे २९ डिसेंबर २०१५ रोजी निधन झाले. 
.......


महिपाल
२४ डिसेंबर १९१९ जोधपूर येथे महिपाल यांचा जन्म झाला. महिपाल यांचे पूर्ण नाव महिपाल भंडारी. जोधपूर येथील श्रीमंत ओसवाल जैन कुटुंबात जन्मलेल्या महिपाल यांच्या वडिलांचा व्यवसाय कोलकाता येथे होता. महिपाल यांच्या आजोबांना चित्रकला आणि कवितांमध्ये रस होता, ज्याचा महिपाल यांच्यावर परिणाम झाला. महिपाल यांनी चौथीत असताना शाळेच्या ‘अभिमन्यू’ नाटकात काम केले होते, ज्यात त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. 

नंतर त्यांनी शाळा व महाविद्यालयीन सांस्कृतिक कार्यक्रमांत भाग घ्यायला सुरुवात केली. महिपाल यांची भाषेवर पकड होती. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन जीवनात कविता करण्यास सुरुवात केली. १९३७मध्ये उदयपूरमध्ये झालेल्या कविसंमेलनात त्यांनी भाग घेतला होता. त्यात त्यांनी शेतकऱ्यांवरील ‘जो जग को अन्न प्रदान करे’ ही कविता वाचली होती, तेव्हा प्रख्यात कवि पं. सोहनलाल द्विवेदी यांनी त्यांना मिठी मारली होती. ही कविता १९९०मध्ये माजी न्यायाधीश व खासदार गुमानमल लोढ़ा यांनी संसदेत वाचली होती. 

१९४०च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात मिनर्व्हा मूव्हिटोनचे संगीतकार जी. पी. कपूर आणि सोहराब मोदी यांचे सहायक पेसी बिलिमोरिया नव्या चेहऱ्याच्या शोधात जोधपूरला आले होते. चित्रपटाचे निर्माते होते लखनौचे सेठ आनंदबिहारी लाल खंडेलवाल होते. ते जी. पी. कपूर यांचे निकटवर्तीय होते. दिग्दर्शनाची जबाबदारी पेसी बिलिमोरिया यांच्यावर होती. महिपाल यांचा बालपणीचा मित्र कैलाश (अभिनेता ओम शिवपुरीचा मोठा भाऊ) यांना जी. पी. कपूर भेटले व तेथून महिपाल यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. 

महिपाल यांना चित्रपटाची मुख्य भूमिका आणि कैलाश यांना दुसरी भूमिका मिळाली व त्या फिल्म कंपनीत महिना १५० रुपये पगाराची नोकरी सुरू केली. १९४२ साली हिंदीत ‘नजराना’ व मारवाडीत ‘निजराणो’ या नावाने प्रदर्शित झालेला हा द्विभाषी चित्रपट फ्लॉप झाला व त्यामुळे महिपाल यांची नोकरी सुटली व ते काम शोधात मुंबईला आले. मुंबईतील महिपाल यांचे सुरुवातीचे दिवस खूप हलाखीत गेले. एक दिवस त्यांची दिग्दर्शक चतुर्भुज दोशी यांची भेट लेखक पंडित इंद्र यांच्यामार्फत झाली, ज्यांनी महिपाल यांना शंकर-पार्वती या चित्रपटात कामदेवची भूमिका दिली. 

१९४३मध्ये ‘रणजित मूव्हीटोन’  बॅनरखाली बनलेला हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यासाठी महिपाल यांना ४०० रुपये देण्यात आले होते. त्याच वेळी महिपाल व्ही. शांताराम यांना भेटले व महिपाल ‘राजकमल कलामंदिर’ येथे महिना शंभर रुपये पगारावर नोकरीला लागले. महिपाल यांनी १९४४ साली ‘राजकमल’च्या बॅनरखाली आलेल्या ‘माली’ चित्रपटात केवळ ‘विष्णू’चे काम केले व या सोबतच ‘माली’ चित्रपटाचे ‘हम तो भोले-भाले माली’ हे शीर्षकगीतही लिहिले. याला संगीत मास्टर कृष्णराव यांचे होते. ‘राजकमल कलामंदिर’ येथे असताना त्यांनी अनेक कलाकारांना हिंदी उच्चार शिकवले. काही दिवस ते मास्टर विनायक यांचे सहायक होते आणि त्यांनी ‘राजकमल’ च्या बॅनरखाली आलेले चित्रपट ‘अंधोकी की दुनिया’ (१९४७) आणि ‘बनवासी’ (१९४८) यांमध्ये नायक म्हणून काम केले. याचदरम्यान महिपाल यांनी १९४७ साली ‘चन्द्रमा पिक्चर्स’ बॅनरखाली बनलेल्या ‘आप की सेवा में’ चित्रपटासाठी आठ गाणीही लिहिली. हा चित्रपट लता मंगेशकर यांचा पार्श्वगायिका म्हणून पहिला चित्रपट होता. दत्ता डावजेकर यांनी संगीत दिले होते आणि अभिनेत्री रोहिणी भाटे यांच्यावर चित्रित ठुमरी ‘पा कलाम करजोरी रे’ लता मंगेशकर यांनी रेकॉर्ड केलेले पहिले हिंदी प्लेबॅक गाणे होते. 

राजकमल कलामंदिरमध्ये साडेतीन वर्षे काम करूनही पगार वाढला नाही, म्हणून त्यांनी सोहराब मोदी यांच्या ‘मिनर्वा मूव्हिएटोन’चे ‘नरसिंह अवतार’ व ‘दौलत’हे दोन चित्रपट स्वीकारले. दौलत चित्रपटात नायिका मधुबाला होती आणि हे दोन्ही चित्रपट १९४९ साली प्रदर्शित झाले. पुढे अचानक एके दिवशी महिपाल यांना निर्माता-दिग्दर्शक होमी वाडिया यांनी फोन केला आणि कृष्ण म्हणून त्याच्या ‘बसंत पिक्चर्स’ या बॅनरखाली तयार होणाऱ्या ‘गणेश महिमा’ चित्रपटामध्ये साइन केले. या चित्रपटाची नायिका मीना कुमारी होती. १९५० मध्ये प्रदर्शित झालेल्या हा चित्रपट ज्युबिली हिट ठरला आणि महिपाल यांना पौराणिक चित्रपटांच्या स्टारचा दर्जा मिळाला. 

पुढे ‘बसंत पिक्चर्स’ च्या बॅनरखाली बनलेले मीना कुमारी आणि महिपाल अभिनित, ‘हनुमान पाताल विजय’, ‘लक्ष्मीनारायण’ व ‘अलादीन और जादुई चिराग’ आणि ‘बसंत पिक्चर्स’च्या बॅनरखाली बनविलेल्या चित्रपटात ही जोडी खूपच हिट ठरली होती. १९५९ साली ‘नवरंग’ हा चित्रपट प्रदर्शित झाला व हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात या चित्रपटाने आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले. महिपाल यांनी आपल्या चार दशकांच्या कारकीर्दीत एकूण १३० चित्रपटांत कामे केली. त्यापैकी १०८ चित्रपटांत ते नायक होते. बहुतेक पौराणिक चित्रपटांमध्ये त्यांच्या नायिका मीना कुमारी, अनिता गुहा किंवा निरुपा राय होत्या तर शकीला, चित्रा किंवा श्यामा या इतर चित्रपटांमध्ये. 

१९६०च्या दशकाच्या त्यांची कारकीर्द उंचावर होती. पण १९७० च्या दशकात पौराणिक चित्रपटांबद्दल प्रेक्षकांची आवड कमी होऊ लागली. त्यामुळे महिपाल यांनी छोट्या भूमिका करण्याऐवजी अभिनयातून निवृत्ती घेतली. १९७८ साली आलेला ‘गंगासागर’ आणि १९८० साली आलेला ‘बद्रीनाथ धाम’ हे त्यांचे शेवटचे चित्रपट ठरले. महिपाल यांचे निधन १५ मे २००५ रोजी झाले.

माहिती संकलन : संजीव वेलणकर

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZSZCM
Similar Posts
‘लावण्यवती’ चित्रपटसृष्टीच्या चंदेरी चमचमीचे यथार्थ दर्शन घडवणाऱ्या व तारे-तारकांच्या चकचकीत प्रतिमांची रेलचेल असलेल्या अनेक मासिकांमधून मी या अभिनेत्रीचे असंख्य फोटो पाहिले होते. त्या सर्व प्रकाशचित्रांत तिने केलेला मेक-अप वेगवेगळा असला तरी त्याचं साह्य पुरेपूर होतं; पण आत्ता समोर चेहऱ्यावर कणभरही मेक-अप नसलेली माधुरी उभी होती
राम गणेश गडकरी, डी. एस. खटावकर, पं. दिनकर कैकिणी नामवंत लेखक, कवी, नाटककार राम गणेश गडकरी, ख्यातनाम शिल्पकार, चित्रकार, मूर्तिकार दत्तात्रेय श्रीधर खटावकर आणि आग्रा घराण्याचे गायक पं. दिनकर कैकिणी यांचा २३ जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
अशोक समेळ, मिलिंद इंगळे, स्मिता सरवदे-देशपांडे, शेख मुख्तार ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ, प्रसिद्ध संगीतकार व गीतकार मिलिंद इंगळे, प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता सरवदे-देशपांडे यांचा १२ मे हा जन्मदिन. तसेच, बॉलीवूडचे पहिले ‘माचो मॅन’ अभिनेते शेख मुख्तार यांचा १२ मे हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
नंदू भेंडे, जेम्स पार्किन्सन, शुभांगी अत्रे-पुरी मराठीतील पहिले रॉकस्टार नंदू भेंडे यांचा ११ एप्रिल हा स्मृतिदिन. तसेच, पार्किन्सन्स डिसीजचा शोध लावणारे ब्रिटिश डॉक्टर जेम्स पार्किन्सन आणि अभिनेत्री शुभांगी अत्रे-पुरी यांचा ११ एप्रिल हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language